सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात १३ ऑक्टोबरला कोल्हापुरात भव्य मोर्चा...

६ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार

<p>सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात १३ ऑक्टोबरला कोल्हापुरात भव्य मोर्चा...</p>

कोल्हापूर - लेह-लडाखमधील जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारकडून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लडाखमध्ये मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. लडाखमध्ये सध्या इंटरनेट शटडाऊन, कर्फ्यू, आणि आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात माजी सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही परिस्थिती हुकूमशाहीची निदर्शक असून, वांगचुक यांनी लढलेल्या मुद्द्यांवरच भाजपने पूर्वी आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं, हे विसरता कामा नये.

कोल्हापुरातील सर्व धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नागरिक, सामाजिक, शेतकरी व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. “संपूर्ण कोल्हापूरची हाक – अन्यायाच्या विरोधात उभं राहूया!” असा निर्णय आज टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी गिरीश फोंडे म्हणाले, "भारतीय संविधान लोकांना अभिव्यक्ती व शांततामय आंदोलनाचा अधिकार देतं. मात्र मोदी सरकार या अधिकारांचा गळा घालत आहे. लडाखमधील गोळीबार आणि सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा हे गंभीर प्रकार आहेत. कोल्हापूर ही शाहूंची भूमी आहे, येथून मोठं ऐतिहासिक आंदोलन उभारू."

प्राचार्य टी.एस. पाटील म्हणाले, "लडाखमधील जमिनी अदानीला देण्यासाठी सरकार स्थानिक लोकांवर अन्याय करतंय. याचा विरोध करूया."

विजय देवणे म्हणाले, "प्रसारमाध्यमं सरकारच्या दबावात असून वांगचुक यांच्या अटकेबद्दल योग्य माहिती देत नाहीत. कोल्हापूर पद्धतीने आक्रमक आंदोलन उभं करूया."

रघुनाथ कांबळे म्हणाले, "सोनम वांगचुक यांनी निस्वार्थीपणे समाजासाठी काम केलं आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीवर अन्याय म्हणजे संपूर्ण समाजावर अन्याय आहे."

यावेळी रघुनाथ कांबळे, बाबुराव कदम, दिलीप पवार, रवी जाधव, उदय नारकर, चंद्रकांत यादव, प्रकाश जाधव, विश्वास उन्हाळे, महेश जाधव, मधुकर पाटील, संभाजी जगदाळे, दिलदार मुजावर, जीवन बोडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.