जनतेचा भ्रमनिरास आणि स्वप्नभंग करणाऱ्या अकार्यक्षम व हतबल आमदार क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा – शिवसेना उपनेते संजय पवार

कोल्हापूर – शहरातील विविध विकास कामांतील अपयश, सार्वजनिक सुविधा व प्रशासकीय अडचणी यावरून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काल झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर, त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेत त्यांनी “राजीनामा द्यावा” अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलीय.
दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर गेली अनेक वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात. असं असूनही कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी, दर्जेदार रस्ते, आरोग्य सेवा, सार्वजनिक बागा, क्रीडांगणे त्यांना देता आली नाहीत. या सर्व बाबतीत त्यांनी कोल्हापुरकरांची निराशा केलीय. राज्य नियोजन मंडळासारख्या उच्च दर्जाच्या पदावर कार्यरत असूनही शहरात कोणतेही ठोस बदल झालेले दिसत नाहीत. विकासाच्या अनेक घोषणा केवळ घोषणाच राहिल्या, हे त्यांचं अपयश आहे. प्रशासनावरील ताबा सुटल्यानं कालच्या महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीतील त्यांची “हतबलता” दिसून आली. बैठकीतली झाडाझडती ही मिलीभगत असून केवळ निवडणुकीपूर्वीची स्टंटबाजी आहे,” असा आरोप संजय पवार यांनी केलाय. तसंच, “100 कोटींच्या निधीसह कोट्यवधींच्या योजनांची घोषणा होऊनही, प्रत्यक्षात काहीच न आल्यानं त्यांनी जनतेचा भ्रमनिरास आणि स्वप्नभंग केलाय. सर्व खापर प्रशासनावर न फोडता, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही स्वतःही जबाबदार आहात. त्यामुळं जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी देखील पवार यांनी केलीय.
कोल्हापुर शहरातील जनतेत वाढती नाराजी, विकासकामांतील ठोस प्रगतीचा अभाव, आणि शहराच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता केवळ राजकीय विरोधकांकडून नाही, तर सामान्य जनतेतूनही उमटू लागलीय. सध्या निवडणूक जवळ येत असताना ही मागणी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते.