सभासदांचा आवाज दाबून पार पडली भीमा साखर कारखान्याची ऑनलाईन सभा
सभासदांचे माईक म्यूट, चॅट बॉक्स बंद ठेवून सर्व विषय मंजूर

सोलापूर - सोलापूर जिल्हयातील टाकळी सिकंदर इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीच कारण पुढं करत सत्ताधाऱ्यांनी ही सभा ऑनलाईन ठेवली. मात्र, ही सभा सोलापुरातील कारखानास्थळाऐवजी मर्जीतील मोजके संचालक आणि निवडक सभासदांना कोल्हापुरात बोलावून घेण्यात आली. कारखान्याकडून झूम बैठकीव्दारे घेतलेल्या या बैठकीची लिंकचं ओपन झाली नाही. सभासदांचे माईक म्यूट, चॅट बॉक्स बंद ठेवून सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेत राज्यसभा खासदार महाडिक यांनी मागील वर्षीच्या गळीत हंगामातील थकीत पगार आठवडाभरात देण्याची ग्वाही दिली. तर चेअरमन विश्वराज महाडिक यांनी, २०० कोटींचे कर्ज उभारून डिस्टिलरी आणि इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं या सभेत जाहीर केलं. कारखान्याचे बावीस हजारहून अधिक सभासद आहेत. या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस देताना भीमा सहकारी साखर कारखाना असा उल्लेख केलाय. मात्र या वार्षिक सभेत सत्ताधाऱ्यांनी कारखाना मल्टीस्टेट केलाय अशी कबुली दिलीय. शिवाय सभासदांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये ऑनलाईन बैठकीत व्यत्यय आल्यास पाच ऑक्टोबर रोजी सभा पुन्हा घेवू असं सांगण्यात आलंय. त्यापध्दतीनं सभा व्हावी, अशी मागणी या झूम बैठकीला सहभागी होवू न शकलेल्या समाधान शेळके, युवराज भोसले, हनुमंत चव्हाण, दिलीप डोंगरे, रमेश काळे, सुरेश डोंगरे, पोपट शेळके, संतोष भोसले, शहाजी मोरे, प्रकाश सोनटक्के, भारत पवार रमेश काळे या सभासदांनी केलीय. या सभेत सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन बैठकी दरम्यान सहभाग व संवादच बंद केल्यानं ही सभा म्हणजे एकतर्फी कारभाराचा नमुना ठरली. या अगोदरचा अनुभव पाहता आश्वासनापलीकडं काहीही मिळालेलं नाही. त्यामुळं सभासद आणि कामगारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण पसरलंय