बाळासाहेब देसाईंच्या तळमळीमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होऊ शकले : मंत्री शंभुराज देसाई

<p>बाळासाहेब देसाईंच्या तळमळीमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होऊ शकले : मंत्री शंभुराज देसाई</p>

कोल्हापूर – लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या तळमळीमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन मंत्री शंभुराज देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील," लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे" ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे संकलित आणि संपादित 'विचारधन लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणं भाग-१' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना मंत्री देसाई यांनी, शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरात असावे की सातारा याविषयी दुविधा होती. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापूर इथंच विद्यापीठ होण्यासाठी त्यांनी आग्रह लावून धरला. मंत्रिपदाच्या काळात गोरगरीबांच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करून त्यांच्या हितासाठी  आणि शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे विचार आणि वारसा यांची जाणीव ठेवून वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री आबिटकर यांनी, आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तीगत स्वार्थ मोठा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईंसारखे निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. विजय चोरमारे यांनी, देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली असे सांगितले. प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता. अत्यंत अभ्यासू, संयमी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, आपल्या भाषणात डॉ. विजय चोरमारे यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भाषणांचे संकलन करून मोठे काम केले असल्याचे सांगितले. तथापि, त्यांच्या कार्याचं बरंचसं संकलन अद्यापही बाकी आहे. त्यामुळे पुढील भागांच्या कामालाही त्यांनी सुरवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. अविनाश पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.