ग्राहक पंचायत महाराष्ट्रची जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची संयुक्त सहामाही बैठक कोल्हापुरात उत्साहात संपन्न

<p>ग्राहक पंचायत महाराष्ट्रची जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची संयुक्त सहामाही बैठक कोल्हापुरात उत्साहात संपन्न</p>

कोल्हापूर - ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने कोल्हापूर जिल्हा व तालुका कार्यकारिणीची संयुक्त सहामाही बैठक गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापुरात उत्साहात पार पडली. या बैठकीत ग्राहक हक्क संरक्षण, जनजागृती, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि भविष्यातील उपक्रम यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीच्या माध्यमातून ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजाभिमुख, लोकाभिमुख कार्यासाठी संघटना अधिक व्यापक पातळीवर कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अध्यक्षस्थानी कामगार कल्याण मंडळ, कोल्हापूरचे केंद्र संचालक व ग्राहक पंचायत सांगलीचे साधक सचिन खराडे होते.

यावेळी सचिन खराडे म्हणाले, "ग्राहक पंचायतचं कार्य व्यापक आहे. कार्यकर्त्यांनी स्वयं-अभ्यास, माहिती संकलन आणि जनतेच्या अडचणी समजून घेऊन योग्य पातळीवर पाठपुरावा करणे आवश्यक आहे."

राज्य कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याची प्रशंसा करत, या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्या सोडवल्या गेल्या असून, भविष्यातही राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र हे एकत्रितपणे कार्यरत राहतील असे सांगितले.

जिल्हा संघटक व विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य अशोक पोतनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक करून बैठकीचा हेतू स्पष्ट केला. जिल्हाध्यक्ष बी.जे. पाटील यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. शाळा व महाविद्यालयांमध्ये 'सजग विद्यार्थी ग्राहक अभियान' राबवण्यात येणार असून कार्यात सुलभता आणण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना विशिष्ट तालुक्यांचे पालकत्व देण्यात येणार आहे. नव्याने निवड झालेल्या सदस्यांना ओळखपत्र आणि राज्य अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर ग्राहक मार्गदर्शन मेळावे देखील आयोजित केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि श्रध्येय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव दादासो शेलार यांनी केले.

बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, सतीश फणसे, सुरेश माने, प्रवासी महासंघाचे संजय पवार, ॲड. विजयालक्ष्मी कामत यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य, पदाधिकारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.