"इतर कुणाची तक्रार नाही आणि तुमचीच फक्त तक्रार का ?" - हरकती सुनावणीवेळी अधिकाऱ्यांचा वादग्रस्त प्रश्न
कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सुनावणीवरून आरोप

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसह कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालीय. या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींची आज सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते युवराज रमेश जाधव यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६आणि ७ बाबत हरकत दाखल केली होती. सुनावणीदरम्यान अतिरिक्ती जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आमचं म्हणणं ऐकून न घेता सुनावणीची प्रक्रिया घाईघाईनं पार पाडली त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा भंग झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. सुनावणी दरम्यान महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी अनुपस्थित होत्या. त्यामुळं ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्यानं पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी करत याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि नगरविकासच्या प्रधान सचिवांकडं लेखी तक्रार दिली असल्याचं युवराज जाधव यांनी सांगितलंय.
दरम्यान, सुनावणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी, " इतर कुणाची तक्रार नाही आणि तुमचीच फक्त तक्रार का ?" असं वादग्रस्त वक्तव्य केल्याचं युवराज जाधव यांनी म्हटलंय.