कोल्हापूरचा शाही दसरा...निधी विसरा..? : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक
...अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालू : रविकिरण इंगवलेंचा इशारा

कोल्हापूर- म्हैसूर नंतर देशभरात कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिध्द आहे शाही दसरा साजरा करण्यासाठी यापूर्वी राज्य सरकारनं निधी दिला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारनं कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख उत्सवाचा दर्जा देऊन सुध्दा अद्याप निधी दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, राज्य सरकार कोल्हापूरला सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप केला. त्यांनी देवा भाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या राज्य सरकारकडं कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी निधी नसेल तर मंत्र्यांनी त्यांचं मानधन देवून कोल्हापूरच्या दसरा महोत्सवासाठी निधी द्यावा अशी मागणी केलीय. दसऱ्यासाठी निधीची तरतूद झाली नाही तर पालकमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना निवेदन सादर करताना राजू यादव, बापू चौगले, सरदार टिप्पे, हाजी असलम सय्यद, रोहित शिंदे, अजय माने, राजू यादव, हर्षल पाटील, स्वरूप मांगले, विवेक काटकर, रवींद्र चौगले, शशी बिडकर आदी उपस्थित होते.