मत चोरांची मुख्य निवडणूक आयुक्त करतात सुरक्षा...: खा. राहुल गांधींनी पुराव्यासहित आयोगाचा वाचला पाढा

नवी दिल्ली – देशातील प्रत्येक निवडणुकीत मत चोरी आणि घोटाळे झाले आहेत. हरियाना, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकातील मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आली आहेत. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली आहेत. या सर्व मत चोरांची सुरक्षा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
आज त्यांनी पत्रकार परिषद घेवून निवडणूक आयोगाकडून मत चोरीच्या होत असलेल्या घोटाळ्याबाबत पुराव्यासहित आयोगाचा पाढा वाचला.
कर्नाटकच्या आळंद येथे ६ हजार ८० मते वगळण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले. हे सगळं सॉफ्टवेअर वापरून करत आहेत. आयोगाने एक आठवड्यात या सगळ्याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या यंत्रणेला मदत करत आहेत. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारीने माहिती शेअर करत आहे. आम्ही पुराव्यासह या गोष्टी मांडत आहोत. पूर्ण निवडणूक प्रक्रिया हायजॅक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.