फुलेवाडी रिंग रोड परिसरात नवीन पोलीस चौकी स्थापन करा : ठाकरे गटाची मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर - शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्यात वाढणारी लोकसंख्या यामुळे प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे.
फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत आणि बालिंगा या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टोळी युध्दातून गुंडांचे खून, मारामाऱ्या, महिलांचे विनयभंग आणि खंडणीसारख्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतीय. स्थानिक पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र खूप मोठे असल्यामुळे संबधितांवर वेळेवर पोलीस कारवाई होत नाही. त्यामुळे गुन्हेगार निर्भय होत चालले असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय.
उपनगरांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने या भागात तात्काळ पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी करणारे निवेदन पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना सादर करण्यात आले आहे.
यावेळी पक्षाचे उपनेते संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, विराज पाटील, स्मिता मांडरे, रुपाली घोरपडे, मंजीत माने आदी उपस्थित होते.