खरा आमदार गायब... पुतण्या झाला 'प्रतिआमदार'...

रायगड – रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित सरकारी कार्यशाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय . स्थानिक आमदारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पुतण्यानं कार्यक्रमाला हजेरी लावून भाषण ठोकलं आणि थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या प्रकारावरून जोरदार टीकेची झोड उठली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली जातीय.
कार्यशाळा हा एक औपचारिक, शासकीय कार्यक्रम असतो. त्यामध्ये स्थानिक आमदारांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. कर्जतचे आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, आमदार महेंद्र थोरवे अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या पुतण्याने, प्रसाद थोरवे यांनी त्यांच्याऐवजी उपस्थित राहून आमदारासारखी भूमिका बजावली. प्रसाद थोरवे यांनी भाषण करत अधिकाऱ्यांना थेट मार्गदर्शन केल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत. कोणतंही पद नसलेल्या व्यक्तीला अधिकृत व्यासपीठावर बोलण्याची परवानगी कोणी दिली? हा मुख्य सवाल उपस्थित होतोय.
या प्रकरणावरून आता महायुतीमधीलच नेते आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रंजना धुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केलीय. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “कोणीही येतो आणि कुणाच्याही खुर्चीवर बसतो,” अशी टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधित्व, शासकीय शिस्त आणि प्रशासनाची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.