महापालिकेत ‘खासगी मेजवानी’चा प्रकार; अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने नाराजी
कोल्हापूर महापालिकेत शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीनंतर एका वरिष्ठ गटनेत्याच्या वर्तणुकीची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. बैठकीदरम्यान संबंधित गटनेत्याकडून स्थायी समिती सदस्यांसाठी खासगी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जेवण सुरू होण्यापूर्वी उपस्थित अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली. बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या जेवणावेळी “हे फक्त सदस्यांसाठी आहे” असे सांगत अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती महापालिका वर्तुळातून समोर येत आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, “खासगी स्वरूपाचे जेवण असेल तर ते महापालिकेच्या सभागृहात न ठेवता बाहेर आयोजित करावे,” अशी चर्चा आता अधिकाऱ्यांमध्ये खासगीत सुरू झाली आहे.
सभागृह आणि प्रशासकीय जागांचा वापर वैयक्तिक किंवा पक्षीय सोयीसाठी होऊ लागल्याची टीकाही यानिमित्ताने होत आहे. वरिष्ठ गटनेत्यांनीच अशा प्रकारे वागणे योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्याचा प्रकार प्रशासनाचा अवमान करणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, सर्वसाधारण सभांमध्येही अशाच प्रकारे नगरसेवकांपेक्षा त्यांच्या समर्थक आणि सोबतच्या व्यक्तींचीच अधिक गर्दी होत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. त्यामुळे अनेक नगरसेवक आणि अधिकारीही नाराजी व्यक्त करत आहेत. सभागृहातील शिस्त, प्रवेश नियंत्रण आणि अधिकृत कार्यक्रमांच्या मर्यादा याबाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.