तीन अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक; १२ दुचाकी जप्त, ९ गुन्हे उघडकीस
कोल्हापूर — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तीन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किंमतीच्या १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ९ गुन्हे उघडकीस आले असून संशयित आरोपी दर्शन रमेश जाधव, फारूक फिरोज शेख, प्रतिक विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने रेकॉर्डवरील आरोपींची माहिती गोळा करून तसेच गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन तपास सुरू ठेवला होता.
दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दर्शन जाधव (वय २६, रा. फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) व त्याचा साथीदार मोटारसायकली विक्रीसाठी कोतवाल नगर परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना विना नंबर प्लेटच्या यामाहा व अॅक्सेस दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनांची तपासणी केली असता एक अॅक्सेस दुचाकी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत आरोपींनी आणखी ८ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्या दर्शन जाधवच्या घराजवळून जप्त करण्यात आल्या. तपासात प्रतिक पाटील (रा. फुलेवाडी रिंग रोड) याच्या मदतीने आणखी २ दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. त्या देखील जप्त करून प्रतिक पाटील याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी चोरीसाठी वापरत असलेली टीव्हीएस मॅक्स मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून तिचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडलेले होते. विशेष म्हणजे, ही दुचाकी मॉडिफाय करून त्यावर यामाहा कंपनीचा लोगो लावण्यात आला होता. जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर, यामाहा, अॅक्सेस, केटीएम ड्युक आणि वेस्पा मोपेड यांचा समावेश असून संबंधित गुन्हे जुनाराजवाडा व करवीर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. अधिक तपासासाठी संशयिताना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार व पोलीस उपअधीक्षक (शहर) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.