भूपाल शेटे यांना पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार जाहीर...
कोल्हापुरात येत्या शनिवारी सतेज काव्य संमेलन रंगणार...
कोल्हापूर - आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सतेज काव्य मंचच्यावतीने 105 कवींचे भव्य सतेज काव्य संमेलन होणार आहे. यावेळी पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कारही दिला जाणार आहे आणि हा पुरस्कार कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना जाहीर झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ कामगार नेते व निमंत्रक सुरेश केसरकर यांनी दिली आहे.
कवी डॉ. वसंत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10:30 वाजल्यापासून संमेलनाला सुरुवात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक व चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रकाशक अनिल म्हमाने, सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख पाच हजार रुपये, पंचवीस हजारांची पुस्तके आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. मिनल राजहंस, डॉ. वसंत भागवत संपादित नव्या विचारांच्या नव्या कविता या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. या पत्रकार परिषदेला अनिता काळे, अंतिमा कोल्हापूरकर, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, दिनकर आडसूळ उपस्थित होते.