‘..मै हारा नहीं हूँ’  : पक्षाच्या कारवाईवर खा. राघव चड्ढाचं ट्वीट

<p>‘..मै हारा नहीं हूँ’  : पक्षाच्या कारवाईवर खा. राघव चड्ढाचं ट्वीट</p>

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने अचानक बुधवारी कोणतंही कारण न देता पक्षाचे राज्यसभेतील उपनेते राघव चढ्ढा यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात पक्षानं राज्यसभा सचिवालयाला सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. तसेच, राघव चढ्ढांना यापुढे पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये, असेही पक्षाने म्हटले आहे. यावर आज ट्वीट करून खा. राघव चड्ढा यांनी पक्षाला इशारा दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेत  महागाई, डिलिव्हरी बॉईजच्या समस्या, अन्नातील भेसळ, टोल प्लाझा, बँक चार्जेस अशा अनेक विषयांवर  खा. राघव चड्ढा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. असं असताना त्यांना राज्यसभेत बोलू दिले जावू नये यासाठी पक्षाने अचानक केलेल्या कारवाईमुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. 

खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ 'आम आदमी’ को मेरे संदेश असं म्हणत त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे कि, “मला जेव्हा जेव्हा संसदेत बोलायची संधी मिळते, तेव्हा मी लोकांचे प्रश्न तिथे मांडतो. कदाचित ते असे विषय असतात जे सामान्यपणे संसदेत मांडले जात नाहीत. पण मग लोकांचे प्रश्न मांडणं हा गुन्हा आहे का? मी काही चूक केली का? कारण आम आदमी पक्षानं राज्यसभा सचिवालयाला असं कळवलं आहे की, माझ्या संसदेतील बोलण्यावर निर्बंध घालण्यात यावेत. आता माझ्या बोलण्यावर कुणाला बंदी घालावीशी का वाटली?” अशा शब्दांत राघव चढ्ढांनी आम आदमी पक्षाला जाब विचारला आहे.