बिहारमध्ये उलथापालथ : आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी
पटना – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. याला नितीश कुमार यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु या निर्णयाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी विरोध दर्शवल्याचे दिसून येत आहे.
या विरोधासाठी आज सकाळपासून पाटण्यातील नितीश कुमार यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडू नये, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
त्यावर नितीश कुमार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हटले आहे कि, "माझ्या संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, मी बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे”
"मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहारची बांधणी करण्यासाठी, एकत्र काम करण्याची माझी वचनबद्धता अटळ राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल," असे त्यांनी म्हटले आहे.