कोल्हापुरात महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार : आ. राजेश क्षिरसागर

<p>कोल्हापुरात महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार : आ. राजेश क्षिरसागर</p>

कोल्हापूर –  महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार, असे सुतोवाच  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर यांनी केले आहे. पत्रकार बैठकीत  बोलताना महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये दबाव तंत्राचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांकडून महापौर आमचाच होणार, अशा वल्गना केल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर यांनी पत्रकार बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर होणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आणीबाणीच्या परिस्थितीत आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद देण्यात आले. यावेळी फेरबदल झाला तर माझा निश्चित विचार होईल, असे देखील त्यांनी सांगितले. कोल्हापुरात महायुतीसाठी आम्ही सर्वात जास्त त्याग केला असून माझ्या मुलाला महापौर करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असे ते म्हणाले. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांशी समेट करण्याचे काम सुरू असून नाराज कार्यकर्त्यांना योग्य पदे देऊन त्यांना सक्षम केले जाईल, असेही क्षिरसागर यांनी सांगितले.