कल्याण – डोंबिवली महापालिकेत सत्तेची गणितं बदलली
शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला डावलत मनसेची घेतली साथ
मुंबई - कल्याण - डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ सुरु होती. आणि अचानक संख्याबळ वाढविण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला डावलत मनसेची साथ घेत सत्तेचा दावा करण्याच्या तयारीत आहेत.
त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, आज शिवसेनेने (शिंदे) आपल्या ५३ नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. तसेच मनसेनेही त्यांच्या पाच नगरसेवकांचा गट स्थापन केला असून त्यांनी शिवसेनेला (शिंदे) समर्थन दिले आहे, असे म्हटले आहे. मनसेचा आम्हाला पाठिंबा मिळाला आहे, असेही म्हटले आहे.
शिंदेच्या शिवसेनेने कल्याण - डोंबिवली महापालिकेत मनसे विरोधात निवडणूक लढवली असताना त्यांनीच सत्ता स्थापनेसाठी मनसेची साथ घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कि, आम्ही निवडणूक वेगवेगळी लढली असली तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी जे बरोबर येतील त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोध नसेल तर विकासातही अडचण येत नाही. मनसेचे नेते राजू पाटील माझे मित्र आहेत. त्यांनी विकासासाठी महायुतीला समर्थन दिले आहे.