कर्नाटकमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

<p>कर्नाटकमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा</p>

बंगळुरू – कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत बंगळुरू क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 मेनंतर होणाऱ्या ग्रेटर बेंगळुरू एरिया स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.

कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस. संगरेशी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर 24 मेनंतर स्थानिक निवडणुकांची अधिसूचना जाहीर केली जाईल. याशिवाय, या वर्षाअखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरवरच घेतल्या जातील.

ईव्हीएम वापर न करण्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नसले, तरी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास कायद्यात कोणतीही अडचण नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात काहीही गैर नाही, असे निरीक्षण नोंदवले असल्याचा उल्लेख आयोगाने केला.

ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचे आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असतात. त्यामुळे काँग्रेसशासित राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. आयोगाने सांगितले की, सर्व संबंधितांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.