...तर महायुतीचा कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता : आ. सतेज पाटील

<p>...तर महायुतीचा कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर - महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. या निवडणुकीत एकत्र लढूनही महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. मात्र दुसरीकडे केवळ ठाकरे सेनेला सोबत घेवून एकाकी लढलेल्या काँग्रेसला तब्बल ३४ जागा मिळाल्या आहेत. या विजयानंतर महायुतीने कोल्हापूर शहरात पोस्टरबाजी करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला महापालिका निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

हिम्मत असेल तर महायुतीने अडीच वर्षाचा महापौर करून शहराचा विकास करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यात एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, दक्षिण विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आपण महापालिकेतील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर येऊन शहरातील प्रलंबित प्रश्नावर सभागृहात कोणते मुद्दे मांडायचे, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शहर विकासाच्या चांगल्या कामाला आपला पाठिंबा असेल मात्र विकास निधीचा कुठेही गैरवापर होऊ नये. यासाठी एक मजबूत विरोधक म्हणून आमचा सत्ताधाऱ्यांवर अंकुश असेल असेही त्यांनी सांगितले.