राजकारणातून निवृत्त होण्याचा भाजपच्या "या" आमदारानं घेतला निर्णय 

<p>राजकारणातून निवृत्त होण्याचा भाजपच्या "या" आमदारानं घेतला निर्णय </p>

नागपूर - भाजपाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची माफी मागत आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ‘... आता मला थांबायचंय !’ असे खळबळजनक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी, १३ मे रोजी आमदारकी संपुष्टात येत आहे त्या नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन, असेही म्हटले आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे कि, 
... आता मला थांबायचंय !
नमस्कार,
हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.
मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.