प्रचार संपता संपता आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा दिला तिळगूळ : खा. संजय राऊत 

<p>प्रचार संपता संपता आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा दिला तिळगूळ : खा. संजय राऊत </p>

मुंबई – काल निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असला तरीही घरोघरी जाऊन प्रचार करता येणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी चांगलीच मुभा मिळाली आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. यावर खा. संजय राऊत यांनी, 'प्रचार संपता संपता आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला आहे, असा टोला लगावला आहे.
'प्रचार संपला तरीही प्रचार करता येण्याचा हा तिळगूळ... तोही कसा घराघरात जाऊन', असं म्हणत त्यांनी आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला.  'सध्या वातावरण असं आहे की घरोघरी पैशांचं वाटप सुरु. साडीतून, वृत्तपत्रातून पैशांची पाकिटं कार्यकर्ते घरोघरी पोहोचवत आहेत आणि आता तर त्यांना मुभा मिळाली आहे. म्हणून हा नियम मोडून हा तिळगूळच आयोगानं दिलाय का? असा प्रश्न उभा राहत आहे. आज दिवसभरामध्ये पैसे देणाऱ्यांना बदडण्याचे नाट्य अधिक प्रमाणात घडू शकते. कारण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचे आहे. हिंदू मुसलमान आणि पैशांचा वापर याशिवाय हे निवडणुका जिंकणार नाहीत. यांना कोणताही विचार नाही. फक्त पैशांचे वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर याशिवाय यांच्याकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही.' असेही खा. संजय  राऊत म्हणाले आहेत.