‘इतिहासात बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्येच होता, हे लिहिलं जाईल’ – आमदार सतेज पाटील

<p>‘इतिहासात बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्येच होता, हे लिहिलं जाईल’ – आमदार सतेज पाटील</p>

कोल्हापूर : कोल्हापुरातील दौलत नगर येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सतेज पाटील यांनी भावनिक आणि आक्रमक भाषण करत मतदारांना साद घातली. काँग्रेसशी असलेली निष्ठा आणि राजकीय संघर्ष यांचा ठळक उल्लेख करत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

भाषणात आमदार सतेज पाटील म्हणाले, “काँग्रेसनं मला आमदार केलं, मंत्री केलं आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं. पदावर असो वा नसो, मी काँग्रेस सोडून कुठंही जाणार नाही. आज राजकारणात कोण कुठल्या दिशेनं जातंय, हे कुणालाही समजत नाही. पण तीस वर्षांनंतर जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्येच होता, एवढं नक्की लिहिलं जाईल,” असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलंय.

यावेळी त्यांनी मतदारांना सत्तेचा समतोल राखण्याचं आवाहन केलं. “विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहा ही जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. त्यामुळं आता कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसला संधी द्या आणि सत्तेचा बॅलन्स साधा,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

श्री स्वामी समर्थांच्या उक्तीचा संदर्भ देत आमदार सतेज पाटील म्हणाले, “भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे… त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा,” असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.

यावेळी सत्ताधाऱ्यांवर  टीका करत ते म्हणाले की, “एका बाजूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि दहा आमदार अशी महाशक्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला मी एकटा जनतेच्या बळावर लढतोय. माझ्या अंगावर येणाऱ्यांना छातीवर घ्यायची ताकद बंटी पाटलांमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका,” 

सभेला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.