आमदार सतेज पाटलांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’; सत्ताधारी आमदारावर 40 लाख घेतल्याचा गंभीर आरोप

<p>आमदार सतेज पाटलांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’; सत्ताधारी आमदारावर 40 लाख घेतल्याचा गंभीर आरोप</p>

 

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधारी आमदारावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. एका तरुण कॉन्ट्रॅक्टरकडून तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना “Is it true?” असे कॅप्शन देण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही थेट टॅग करण्यात आले आहे. मतदानापूर्वी या प्रकरणाचा खुलासा व्हावा, अशी स्पष्ट मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापुरात सत्तेत असणाऱ्या आमदारावर असा गंभीर आरोप करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकप्रतिनिधींवर आरोप होत असतील, तर त्याची सत्यता आणि पडताळणी होणं अत्यावश्यक आहे. अन्यथा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळेच हा व्हिडिओ अधिकृत पेजवर टाकून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग केल्याचं त्यांनी सांगितलं.

“नेमका कोण आमदार या व्हिडिओमध्ये दिसतो”, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. संबंधित पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यात तीन आमदार असून, हे आमदार शिंदे गटाचे असल्याची माहिती आमच्याकडे आहे, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी जनतेसमोर येऊन खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात भ्रष्टाचार होत असेल, तर विरोधी पक्ष म्हणून त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आहे, असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या सायबर सेलमार्फत या व्हिडिओची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मतदानापूर्वी मतदारांना सत्य कळणं गरजेचं आहे. आपण कोणाला आणि कशासाठी मतदान करतोय, हे स्पष्ट झालं पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी सरकारची आहे, असंही आमदार सतेज पाटील यांनी ठामपणे सांगितलं.