कोल्हापूर महानगरपालिकेच्या बायोगॅस प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीस सुरुवात
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून वीज निर्मिती प्रकल्पातून आता प्रत्यक्ष विद्युत निर्मितीला सुरुवात झाली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही दृष्टीने हा प्रकल्प शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कोल्हापूर शहरातून दररोज सरासरी 280 ते 300 टन कचरा संकलित केला जातो. यामधील सुमारे 100 ते 120 टन ओला कचरा भाजी मंडई, हॉटेल वेस्ट तसेच घरगुती कचऱ्यापासून वेगळा करून कसबा बावडा येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणला जातो. या ठिकाणी महानगरपालिकेचे एकूण दोन बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. यापैकी 30 टीपीडी क्षमतेचा प्रकल्प सन 2019 मध्ये उभारण्यात आला असून, स्वच्छ भारत मिशन (टप्पा 2) अंतर्गत 20 टीपीडी क्षमतेचा नवीन बायोगॅस प्रकल्प सन 2025 मध्ये सुरू करण्यात आला आहे.
7 नोव्हेंबर 2025 रोजी या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. आता या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात 20 टीपीडी क्षमतेच्या प्रकल्पावरील कन्वेअर बेल्ट, इतर यंत्रसामग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातील पथदिव्यांना या वीज निर्मिती प्रकल्पातून वीजपुरवठा करण्यात येत आहे.
पुढील टप्प्यात झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील 35 हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व मोटर्स या वीज निर्मिती प्रकल्पावर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात प्रकल्पासाठी लागणाऱ्या वीज खर्चात एका वर्षात सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच आगामी काळात या दोन्ही बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर आधारित कॉम्प्रेस्ड सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातून महानगरपालिकेला प्रतिवर्षी अंदाजे 3 ते 4 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दैनंदिन पाठपुरावा करून कामकाज प्रभावीपणे पार पाडले आहे.