आपटे संघाशी निगडीत आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ आहेत का ?
मनसेचा संतप्त सवाल
मुंबई – भाजपने बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना दिले आहे. त्यामुळे राजकारण किती खालच्या पातळीला गेलय, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे. यावर मनसेने आक्रमक होत, ‘आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ आहेत का?, त्या लहान मुलींचा विचार करा. हे भाजपच्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर त्याला सोडलं असतं का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी, भाजप स्वत:ला पांढरपेशा पक्ष समजतो. पण तुषार आपटेसारख्या विकृत लोकांना नगरसेवक करुन पक्षात घेतले जाते. यावरून भाजपची मानसिकता कळते. मनसे अशा व्यक्तींचा निषेध करते. बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. भाजप पक्षाला विनंती आहे की, तुषार आपटेला ताबडतोब स्वीकृत नगरसेवक पदावरून हटवा, अन्यथा गाठ मनसेशी आहे. आपट्याच्याबाबत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये महामोर्चा काढला जाणार, असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.