भाजप निवडणुकीत गैरमार्गाचा अवलंब करतंय - कॉम्रेड चंद्रकांत यादव
कोल्हापूर शहरातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत बोलताना सीटूचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉग्रेड चंद्रकांत यादव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक हे एक आव्हान असल्याचं सांगितलं. देशात लोकशाही टिकणं गरजेचं असताना भाजपनं त्याला बाजाराचं स्वरूप आणलंय. भाजप विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नसल्यामुळं ते गैरमार्गाचा वापर करत असल्याचा घणाघाती आरोप यादव यांनी केलाय.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप पोवार यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. सध्या देशात सर्वत्र जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप केलाय.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही संविधान मानणारे आणि संविधान न मानणारे अशा दोन विचारांमध्ये होत असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे यांनी सांगितलं.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं.
बैठकीला आयटकचे जिल्हाध्यक्ष एस बी पाटील, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील, फेरीवाले संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भोसले, खासगी आराम बस संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलदार मुजावर, बबन पाटील, दीपक निंबाळकर, उमेश पानसरे, मल्हार पाटील, आनंदराव परुळेकर, कुंडलिक एकशिंगे, रवींद्र मोरे यांच्यासह विविध संघटित तसंच असंघटित कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.