‘माझ्यानंतर विकासात्मक काम निलेश, नितेश करतील...' : खा. नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत
सिंधुदुर्ग – सध्या राजकारणात कटकारस्थानं सुरु आहे. त्यामुळे आपण आता ठरवलंय घरी बसायचं.... मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे! चांगलं ते जोपासा' पैशांसाठी राजकारण करू नका, माझ्यानंतर विकासात्मक काम निलेश, नितेश करतील, असे वक्तव्य खा. नारायण राणे यांनी करून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नगरपंचायत निवडणुकीनंतर पहिलांदा खा.राणे सिंधुदुर्गात आले आहेत यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राणेंचे जंगी स्वागत केले. यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना खा. राणे यांनी, 'नारायण राणे आजही रस्त्यावर भाजी घेतो.. माझ्या गाडीला काळी काच नाही. माणुसकीच माझा धर्म आहे असे सांगितले .माझ्या आड अनेकजण आले पण आज त्यावर मी नाही बोलणार. मला तेव्हाही अडचणी आल्या आणि आताही येतात. द्वेष, रोषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, पक्ष सांभाळा, स्वार्थ नको, असेही ते म्हणाले आहेत. राणेंनी निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.