कोल्हापूरच्या प्रभाग ७ मध्ये आमदारपुत्र क्षीरसागर विरोधात रिक्षाचालक… थेट ‘सत्ता विरुद्ध सामान्य कार्यकर्ता'!
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधील लढतीने शहराचं राजकीय तापमान प्रचंड वाढलंय. एकीकडे आमदारांचा वारसा, तर दुसरीकडे रिक्षाचालकाचा संघर्ष… ही लढत केवळ निवडणूक न राहता आता प्रतिष्ठेची आणि व्यवस्थेविरोधातील बंडाची बनलीय.
प्रभाग क्रमांक ७ मधून आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर निवडणूक रिंगणात उतरलेत. सत्ता, संघटन आणि राजकीय ताकदीचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या मागे उभा आहे.
तर त्यांच्या विरोधात उद्धवसेनेने रिक्षाचालक राजेंद्र जाधव यांना संधी दिली आहे.… एक सामान्य रिक्षाचालक, जो रोज रस्त्यावर रिक्षा चालवतो आणि आता थेट सत्तेला आव्हान देतो आहे. ही लढत केवळ दोन उमेदवारांमध्ये नाही, तर दोन विचारांमध्ये आहे. एकीकडे घराणेशाही आणि सत्तेचा वारसा, तर दुसरीकडे घाम गाळणाऱ्या सामान्य माणसाची लढाई. राजेंद्र जाधव यांची प्रचाराची शैली साधी “सत्ता घरात फिरत नाही, ती कामातून मिळते,” असा त्यांना विश्वास वाटतो. तर दुसरीकडे ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडं वडिलांची राजकीय ओळख, समर्थकांची फौज आणि सत्ता यांचा अनुभव आहे. त्यांचा प्रचार ताकदीचा, नियोजनबद्ध आणि मोठ्या यंत्रणेसह सुरू आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक ७ मधील ही लढत आता आमदारपुत्र विरुद्ध रिक्षाचालक, सत्ता विरुद्ध संघर्ष, वारसा विरुद्ध जनतेचा आवाज अशीच बनली आहे. कोल्हापूरचा मतदार सदैव सर्वसामान्य उमेदवारांच्या बाजूनं उभी राहिलीय. या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूनं उभा राहिलाय? सत्तेच्या ताकदीसमोर सामान्य माणसाचा आवाज बुलंद होणार की नाही, याचं उत्तर मतदानाच्या दिवशीच मिळणार आहे.