‘या’ पाच महापालिकांमध्ये महायुती तुटली..?
मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमदेवारांची नावं जाहीर करताना मोठी उलथापालथ करावी लागत आहे. या सर्व घडामोडीत नवी मुंबईत, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सांगली या पाच महापालिकांमध्ये महायुती तुटल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी काही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात असून पक्षश्रेष्ठी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काही ठिकाणी पक्षाचं एकमत होतं आहे तर काही ठिकाणी एकमत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
छत्रपती संभाजी नगरात शिवसेना - भाजप या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याची तयारी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर, अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यात जमा आहे. सांगलीत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार असून, भाजपा बरोबर असणारी युती तुटली आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून स्वबळाचा नारा दिला आहे. नवी मुंबईत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.