मांडेदुर्ग ग्रामस्थांचा क्रशरविरोधात चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा; तहसीलदारांना मोर्चाने निवेदन

<p>मांडेदुर्ग ग्रामस्थांचा क्रशरविरोधात चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा; तहसीलदारांना मोर्चाने निवेदन</p>

चंदगड - मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या खडी (क्रशर) मशिनमुळे गावकऱ्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. हे क्रशर मशिन तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार चंदगड यांच्याकडे केली आहे. यासाठी सोमवारी (दि.२९) गावातील नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढून तहसील कार्यालयात निवेदन सादर केले.

मांडेदुर्ग ग्रामसभेत यापूर्वीच क्रशरविरोधात ठराव मंजूर करून ३१ जानेवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार अर्ज दिला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित क्रशर मशिन आजही राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कडगावकर शेत डोंगर परिसरात सुरू असलेल्या या क्रशरमधून सुमारे १०० फूट खोल क्षमतेचे जिलेटीन ब्लास्टिंग केले जात असल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

२६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता झालेल्या तीव्र स्फोटामुळे (सुमारे ६ रिश्टर स्केल इतका) मांडेदुर्ग गावात प्रचंड नुकसान झाले. अनेक घरांना तडे गेले, काचेच्या खिडक्या फुटल्या, घरगुती साहित्य व टीव्ही संचांचे नुकसान झाले. काही जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच या धक्क्यामुळे कै. सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा गंभीर दावा ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.

रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या विहिरींना तडे गेले असून, जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेली पाण्याची टाकी लिकेज झाली आहे. याशिवाय सुमारे २०० बायोगॅस प्रकल्प निकामी झाले आहेत. पाणलोट क्षेत्रातील सुमारे १५ लाख रुपये खर्चाचे दोन माती नालाबंधारेही धोक्यात आले आहेत. क्रशरच्या ५० टन क्षमतेच्या मालवाहू गाड्या रात्रंदिवस गावातून जात असल्याने प्रचंड धूळ व आवाज होत आहे. त्यामुळे दमा, श्वसनविकार व मानसिक तणाव वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मराठी शाळेजवळून वाहनांची वर्दळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यासावरही गंभीर परिणाम होत आहे.

धुळीमुळे भात, नाचणी, काजू तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले असून, शेती व पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. परिसरात वनक्षेत्र असल्याने वन्यप्राणी गावात येऊन नुकसान करत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी डंपर अडविल्याच्या कारणावरून क्रशर मालकाने ग्रामपंचायत व युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

क्रशर मशिन तात्काळ बंद कराव्यात, नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ५ जानेवारी २०२६ पासून तहसील कार्यालय, चंदगड येथे साखळी उपोषण करण्याचा व येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.