महायुतीत गोंधळ, अंतर्गत संघर्ष उघड; जागावाटपावरून बैठका फिसकटल्या
जळगाव महापालिका निवडणुकीआधीच महायुतीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपा व शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाची बैठक अवघ्या १५ मिनिटांत फिसकटली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून बाहेर पडल्याने नाराजी स्पष्ट झाली. चर्चेतून राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागांच्या आकड्यांवर एकमत न झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. भाजप अधिक जागांवर ठाम, शिंदेसेनेची वाढीव मागणी आणि राष्ट्रवादीचा किमान कोट्याचा आग्रह यामुळे महायुतीतील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवारीवरूनही वाद पेटल्याने महायुतीची एकजूट केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे. अंतिम निर्णय रखडल्याने निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.