कोल्हापूर कस्सं… तुम्ही म्हणशीला तस्स!...आमदार सतेज पाटील यांचा सकाळीच नागरिकांशी थेट संवाद
कोल्हापूर : “कोल्हापूर कस्सं आहे?” या प्रश्नावर नागरिकांनी मोकळेपणाने मांडलेल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा ऐकून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सकाळी सकाळी शहरातील विविध भागांत भेटी देत थेट संवाद साधला. “तुम्ही म्हणशीला तस्स!” या भूमिकेतून त्यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि संबंधित प्रश्नांवर तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले.
या संवाद दौऱ्यात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक, सार्वजनिक सुविधा तसेच स्थानिक विकासकामांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी थेट सूचना देत अपेक्षा व्यक्त केल्या. आमदार पाटील यांनी प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐकत, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्याबरोबरच काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीही केली.
“लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यालयात बसून वाट पाहण्यापेक्षा, आपणच लोकांकडे जायला हवे,” अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतल्याने शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला. लोकप्रतिनिधी थेट रस्त्यावर उतरून प्रश्न ऐकत असल्याने विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सकाळच्या वेळेत नागरिकांशी संवाद साधल्यामुळे कामावर जाण्याआधी आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले.
“कोल्हापूर कस्सं… तुम्ही म्हणशीला तस्स!” हा संवाद केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र या भेटीत पाहायला मिळाले.