भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास त्यांच्या प्रचाराचा इशारा
सोलापुरातील भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे वक्तव्य
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झालीय. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यास, ते महायुतीतील ज्या पक्षातून उमेदवारी भरतील, त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका आम्ही घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिका आणि नव्याने स्थापन झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरूय. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन प्रवेश होत असल्याचे चित्र आहे. सोलापुरात अलीकडे अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांनी, पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही. भाजपमधून तिकीट न मिळाल्यास असे कार्यकर्ते महायुतीतील इतर पक्षातून निवडणूक लढवतील आणि आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभे राहू. असे विधान करत उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. “पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत. उमेदवार किती खर्च करणार, त्याची आर्थिक क्षमता किती आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. भाजपमध्ये अशी पद्धत कधीच नव्हती,” अशी टीका त्यांनी केली.आमदार देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.