‘या’ दोन दिवशी दाजीपूर अभयारण्यामध्ये पर्यटकांना नो एंट्री...
कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत विविध प्रकारे केले जाते. सरत्या वर्षातील कटू आठवणी विसरून , नवी आव्हाने आणि नव्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मित्रमंडळी एकत्र येत जेवणाचा किंवा आऊटींगला जाण्याचा प्लॅन करतात. यातूनच मद्यपान करणे, जंगलात वणवा लावणे, गोंधळ घालणे असे अनाधिकृत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडून नये आणि वन्यजीवाच्या संरक्षणासाठी राधानगरी - दाजीपूर अभयारण्य परिसर ३० आणि ३१ डिसेंबर असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.
या कालावधीत संरक्षण पथकाद्वारे दिवस - रात्र गस्त घालण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे.