पाचगावमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या शाखेचे उदघाटन...
कोल्हापूर - देशाच्या महत्त्वपूर्ण जडणघडणीत आणि आर्थिक विकासात ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक ही देशाची राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे जतन झाले पाहिजे या उद्देशाने अर्थक्रांती जीवन गौरव अभियान ही संस्था ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी कार्य करते. भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्राकडून दहा हजार रुपये मासिक पेन्शन हे सन्मानधन म्हणून मिळावे यासाठी या संस्थेचा लढा सुरू आहे. यासाठी गाव तिथं संस्था हा उपक्रम राबवला जातोय. या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची करवीर तालुक्यातील पाचगाव येथे शाखा सुरु करण्यात आली आहे.
याच्या नामफलकाचे उदघाटन पाचगावच्या सरपंच प्रियंका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे राज्याचे मुख्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील, कोल्हापूर जिल्हा समन्वयक ह भ प महादेव यादव महाराज, ज्येष्ठ सल्लागार पी के पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आनंदराव वायदंडे, वाळवा तालुका अध्यक्ष तानाजी पाटील उपस्थित होते.
या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांना पेन्शन सन्मानधन रुपात मिळवून देण्याचे मुख्य लक्ष आहे. आरोग्य शिबिर, विरंगुळा केंद्र उभारणी, समाज उपयोगी कार्यक्रम दर महिन्याच्या १९ तारखेला राबवण्याचा संस्थेचा संकल्प आहे, अशी माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख संतोष पांचाळ यांनी दिलीय.
या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता युवराज गवळी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, शेतकरी विकास सेवा संस्थेचे चेअरमन उत्तम गाडगीळ, संग्राम पाटील, कुंडलिक पाटील, विठ्ठल रुमाले, मारुती गाडगीळ, चंद्रकांत सस्ते, जनार्दन कांबळे यासह शेतकरी विकास सेवा संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.