खासबाग कुस्ती मैदानातील ९२ लाखांचे लॉन गायब...
शहर अभियंता निरुत्तर...कोल्हापूर महापालिका नेमकी करतीय तरी काय ?
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेचे जलतरण तलाव, उद्याने आणि खासबाग कुस्ती मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही त्यांची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक वापरासाठीची ही ठिकाणे पूर्णपणे निरूपपयोगी असल्याचे कृती समितीने निदर्शनाला आणून दिले होते. त्यांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासकांनी प्रत्येक्ष पाहणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांडरे यांच्यासह कृती समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी खासबाग मैदानात जुलै २०२४ मध्ये बसवलेले ५६ लाखांचे जंपिंग लॉन आणि त्याआधी बसवलेले ३६ लाखांचे लॉन असे मिळून ९२ लाखांचे लॉन सध्या मैदानात अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी शहर अभियंत्यांकडे ९२ लाखांचे लॉन दाखवा..!" अशी मागणी केली असता अभियंता मस्कर यांनी हे काम माझ्या चार्जपूर्वीचे आहे, मला काही माहिती नाही. मी माहिती घेतो, असे उत्तर दिले आहे. यावेळी कृती समिती सदस्यांनी मैदानातील नव्या व्यासपीठासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे दाखवून दिले. या कामासाठी हेरिटेज समितीची परवानगी घेतली का, असा प्रश्न विचारल्यावरही अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत.
दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांच्या नावावर शासनाचा निधी आणला जातो आणि ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे खिसे भरले जातात, असा गंभीर आरोप कृती समितीचे अशोक पोवार यांनी केलाय. यावेळी व्यवस्थापक समीर महाबरी, कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, महादेव जाधव, एस एन माळकर, महेश जाधव, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, प्रसाद बुलबुले, कादर मलबारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.