माले ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या मनमानी आरोपाचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केला इन्कार...
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील माले येथील ग्रामपंचायतीचे, ग्रामपंचायत अधिकारी रायशिंग वळवी हे कोणतंही काम करताना कोणत्याही सदस्याला विश्वासात घेत नाहीत, असा आरोप मालेतील ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता.
ग्रामपंचायत अधिकारी वळवी यांची तात्काळ बदली व्हावी, अशी मागणी त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल न घेतल्याने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रम विजय जमदाडे हे माले ग्रामपंचायती समोर एक दिवशीय उपोषणाला बसले होते. या उपोषणाला विद्यमान सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. या आरोपाबाबत ग्रामपंचायत अधिकारी वळवी यांनी आज पत्रकार बैठक घेऊन आपली बाजू मांडली आणि सदस्यांनी केलेला आरोप निराधार, चुकीचा आणि राजकीय आकसापोटी केला असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीची कोणतीही विकास कामे, गावात राबवल्या जाणाऱ्या योजना या ग्रामपंचायतीच्या ग्राम सभा आणि सदस्यांच्या मासिक सभेत पूर्व सूचना देऊनच, आणि सर्व सदस्यांच्या मंजूरीनेच कराव्या लागतात. त्यानुसार सदस्यांना प्रत्येक सभेची सूचना दिली जाते. तसेच उपस्थिती बद्दल त्यांची स्वाक्षरी देखील घेतली जाते. मात्र तरीही मनमानी करीत असल्याचा आरोप केला जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या पत्रकार बैठकीला सरपंच उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात पाटील, मारुती पाटील, प्रशांत पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते.