बालिंगा जल उपसा केंद्राचा पाणीपुरवठा सोमवारी बंद...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून बालिंगा सबस्टेशनवरील उच्चदाब वाहिनीचे कामकाज हाती घेण्यात येत असल्यामुळे सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालिंगा जल उपसा केंद्र तसेच नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. विद्युत पुरवठा कामकाज पूर्ण होईपर्यंत ही दोन्ही केंद्रे बंद राहतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या ए.बी. वॉर्डसह फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, आपटे नगर टाकी परिसर, कणेरकर नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजीपेठ, महाव्दार रोड, तटाकडील तालीम, उभा मारुती चौक, चिनखांबी गणेश मंदिर परिसर आदी अनेक भागांमध्ये सोमवारचा दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहील.
तसेच मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. सी–डी वॉर्डमधील गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवारपेठ, सोमवारपेठ, ट्रेझरी कार्यालय, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, गुजरी, देवल क्लब, तसेच ई–वॉर्डमधील शाहूपुरीच्या ५ ते ८ गल्ल्यांसह अनेक भागांचा यात समावेश आहे.
पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांसाठी महानगरपालिकेने उपलब्ध टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.