...तर अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांवर होणार कारवाई : मुख्य कार्यकारी अधिकारी

<p>...तर अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांवर होणार कारवाई : मुख्य कार्यकारी अधिकारी</p>

कोल्हापूर -  कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी आणि शाळेच्या वस्तीगृहांची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नुकताच केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकॅडमी आणि वस्तीगृहांच्या नियमबाह्य कामकाजांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिला आहे.

गेल्या वीस वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी आणि शाळेच्या वस्तीगृहांची तपासणी झालेली नाही. जिल्ह्यात अकॅडमींची संख्या वाढली असून सुमारे सव्वाश अकॅडमी आहेत.  या अकॅडमींनी  अनेक निकष पाळलेल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे  या तपासणी अहवालानंतर कारवाईचा आदेश अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या शामराव पाटील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर, वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले होते.

त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी त्याचबरोबर वस्तीगृहांची तपासणी करून त्याचा अहवाल  सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते.

 संबंधित ठिकाणी सीसीटीव्हीची सोय आहे का? विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात. इथपासून तिथल्या एकूणच कामकाजाची माहिती घेण्यास सांगण्यात आले होते. त्याची चेकलिस्ट गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. या सर्व तपासणीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना प्राप्त झाला आहे.