माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीबाबत परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात चर्चा
कोल्हापूर : स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक विविध योजना राज्य शासनाने पत्रकारांसाठी राबविलेल्या आहेत.या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी आज केले.
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाने आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी राष्ट्रीय पत्रकार दिन व अधिस्वीकृती परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी राज्य शासनाने माध्यमांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधाबाबत त्यांनी माहिती दिली. श्री टाके म्हणाले,पत्रकारांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात व अधिकाधिक पत्रकार सुविधांसाठी पात्र ठरावे, असा प्रयत्न शासनाचा आहे.मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक असतात.प्रस्ताव परिपूर्ण करण्यासाठी पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत वृत्तांकनासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या अपेक्षांवरही चर्चा झाली.चर्चेत सहभागी होताना पत्रकारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाने संबंधित कार्यक्रमांचे व्हिडिओ फुटेज (छायाचित्रण) तात्काळ द्यावे अशी सूचना केली. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी शासकीय कार्यक्रमांना व यश कथांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांच्या सुविधांसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली . यावेळी उपसंपादक रणजीत पवार यांनी पत्रकारांसाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांची माहिती दिली.विभागीय माहिती कार्यालयाने यापूर्वी बेळगाव येथील पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिका मार्गदर्शन कार्यशाळा,कोल्हापूर येथील दैनिक/साप्ताहिक संपादक चर्चासत्र आणि आज इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींसाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक संचालक श्रीमती वृषाली पाटील यांनी केले.यावेळी माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कृष्णात जमदाडे, प्रताप नाईक,रणजीत माजगावकर, विजय केसरकर,विजय कुंभार,शेखर पाटील,विश्वास कोरे,विशाल पुजारी अमरसिंह पाटील,चंद्रकांत कबाडे आदी उपस्थित होते .