कोल्हापुरातील पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई गायब...कोल्हापूरकर संतप्त
पंचगंगा घाट अंधारातच.. पडला तो फक्त निधीचा उजेड
कोल्हापूर – शहरातील पंचगंगा नदी घाटाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पंचगंगा घाट सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांपैकी अडीच कोटी रुपयांत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंचगंगा घाट उजळवणारी ही रोषणाई सोशल मिडीयातून चांगलीच झळकली होती. पण काही महिन्यांतच येथील रोषणाईसाठी बसवलेले दिवेच गायब करण्यात आले आहेत. आता येथे काही ठिकाणी वायरिंग आणि रिकाम्या खांबांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत त्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त होत आहे.
या सुशोभीकरणाच्या प्रकल्पातच त्या प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामुग्रीच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांचा समावेश नव्हता का?, कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याला संबंधित यंत्रणांना जबाबदार धरलं जाणार का? की सुशोभीकरणाच्या नावाखाली निधी हडपण्यासाठी ही योजना होती ? असे सवाल आता उपस्थित होऊ लागेल आहेत.