कोल्हापूरी चप्पल उद्योगाने काळानुरूप परिवर्तन करावे : रविंद्र माणगावे
कोल्हापूर - कोल्हापूर चप्पलने जागतिक ओळख निर्माण केली असून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी क्युआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन प्रणालीचा वापर व्हायला हवा, असे प्रतिपादन रवींद माणगावे यांनी केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने कोल्हापुरी चप्पल उत्पादक, कारागीर आणि व्यावसायिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कोल्हापूरचे मूळ कारागीर, उत्पादक, दर्जा यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचून नकली चप्पल विक्री थांबून कारागीरांना त्यांच्या कौशल्याचं योग्य मूल्य मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जगाच्या पाठीवरचे अनेक ब्रेड त्यांनी काळानुसार बदल न केल्यानं इतिहासजमा झाले आहेत. कोल्हापूर चप्पल उद्योगाने त्यापासून बोध घ्यावा. या उद्योगाला तंत्रज्ञानाची मदत देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सदैव तत्पर असेल, अशी ग्वाही माणगावे यांनी दिली. या कार्यशाळेत इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी क्युआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली.
या कार्यशाळेला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य शेखर घोडके, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे, जयेश ओसवाल, अजित कोठारी, खजानिस राहुल नष्टे यांच्यासह संचालक आणि कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.