शिवप्रेमींमधून नाराजी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रप्रदर्शनाच्या  कार्यक्रमाचा फज्जा

गर्दी दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठेवले उपस्थित 

<p>शिवप्रेमींमधून नाराजी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रप्रदर्शनाच्या  कार्यक्रमाचा फज्जा</p>

कोल्हापूर -  छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ येथील  लक्ष्मी विलास पॅलेस  येथे झाला. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमाचा सरकार आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे अक्षरशः फज्जा उडाला. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत बोगस केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार कोल्हापुरात उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी देखील एवढ्या मोठ्या शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येण्याचे टाळले. मात्र धावत्या कार्यक्रमाप्रमाणे एका चारचाकी वाहनातूनच त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मराठा योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांना अभिवादन म्हणून शिवशस्त्र शौर्यगाथा या भव्य मराठा कालीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शस्त्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांची खूपच कमी उपस्थिती होती. त्यामुळे  या कार्यक्रमाला गर्दी दाखवण्यासाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. त्यामुळे कोल्हापूरकरांमधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा  हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असा साजरा होणे अपेक्षित होते. मात्र खुद्द पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनीच, हा कार्यक्रम औपचारिक असल्याचे सांगत वेळ मारली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी या शिवशस्त्र प्रदर्शनांचे उद्घाटन करण्याचे  सरकारचे नियोजन होतं. त्यानुसारच आचारसंहिता लागण्यापूर्वी हा कार्यक्रम औपचारिक पद्धतीने घाईगडबडीत केला गेल्याचे पालकमंत्री आबीटकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.