कोल्हापुरात सोमवारी लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन

<p>कोल्हापुरात सोमवारी लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन</p>

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना आणि इतर संघटनेच्या वतीने लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापुरातील बिंदू चौकातून या मोर्चाला सुरूवात होईल.  मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महानगरपालिका, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असल्याची माहिती लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाच्या आयोजकांनी दिली.

या महामोर्चात आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना, मराठा महासंघ, ओबीसी समाज आणि सेवा संघ, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पार्टी, बंडखोर सेना, मल्हार सेना, संभाजी ब्रिगेड, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज संघटना आदि संघटना सहभागी होणार आहेत. मोर्चामध्ये पन्नास ते साठ हजार संविधान प्रेमी नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला प्राध्यापक शहाजी कांबळे, बी.के.कांबळे, रूपा वायदंडे, विद्याधर कांबळे, बबनराव शिंदे, संजय जिरगे, निलेश बनसोडे, जयसिंग जाधव, अनिल धनवडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.