कोल्हापूरात यंदाचा बळीराजा महोत्सव भव्यदिव्य साजरा करण्यात येणार...

बळीराजा महोत्सवातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला जाणार

<p>कोल्हापूरात यंदाचा बळीराजा महोत्सव भव्यदिव्य साजरा करण्यात येणार...</p>

कोल्हापूर - यावर्षी बावीस ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. बळीराजा महोत्सव समितीच्यावतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या महोत्सवाच्या आयोजना संदर्भात महोत्सव समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये यावर्षीचा बळीराजा महोत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उमेश पवार होते. बैठकीच्या सुरुवातीला सचिव दिगंबर लोहार यांनी आजच्या बैठकी विषयी माहिती देत बळीराजा महोत्सवाचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना उमेश पवार यांनी, मागील एकोणीस वर्षे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या समता नगरीत बळीराजा महोत्सव हा आपल्या समतावादी पूर्वजांचा आणि समतावादी संस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा करत असल्याचे सांगितले. बहुजनांची राष्ट्रीय प्रतीके असलेले छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आदींच्या विज्ञानवादी आणि समतावादी विचारांचा जागर करण्याची गरज लक्षात घेऊन आणि सध्याच्या अराजकसदृश्य वातावरणात राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी, यासाठी यावर्षीचा बळीराजा महोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करूया, असं आवाहन त्यांनी केलं. उपस्थित सर्वांनी त्याला अनुमती दिली.

यावेळी भारताचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या तसंच लडाखमधील सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भाई बाबुराव कदम, संभाजी जगदाळे, बाबाराजे महाडिक, किरण गवळी, महेश जाधव, तेजस्विनी देसाई, सचिन घोरपडे, रामकृष्ण तांदळे, आनंदराव चौगुले, डॉक्टर माधुरी चौगुले, डॉ तेजस्विनी देसाई, सर्जेराव चव्हाण, अॅडव्होकेट अभिषेक मिठारी आदी उपस्थित होते.