शिवाजी विद्यापीठात मधमाशांचा हल्ला...अनेक जण जखमी

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास मधमाशांचे पोळे अचानक तुटले. त्यामुळे त्याच्या अवतीभवती असणारे विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांची आणि सुरक्षारक्षकांची एकच धावपळ उडाली.
काही कळायच्या आतच मधमाश्यांनी त्यांना डंक मारायला सुरुवात केली. मधमाशांचे हे तांडव जवळपास अर्धा तास सुरु होते. यामध्ये जवळपास आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांना शिवाजी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात औषध उपचार सुरु आहे. या संदर्भात युवासेनेचे मंजित माने यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. आधीच हे मधमाशांचे पोळे काढणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष का केले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.