कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गांधीजींचा पुतळा असणाऱ्या मैदानाची दुरवस्था
महात्मा गांधींचं नांव या मैदानाला शोभतं का?

कोल्हापूर - तीर्थांचं शहर ही कोल्हापूरची मूळ ओळख. आजचं गांधी मैदान म्हणजेच वरुणतीर्थ.. या तीर्थाचं पुढं तळं आणि मैदान झालंय. पण या मैदानाची आजची स्थिती बघितली तर याला मैदान म्हणणं धाडसाचं ठरेल. या मैदानासाठी मिळालेला निधी कसा, कुठं खर्च झाला यावरून गेल्या काही महिन्यांपासून जाहीरपणे आरोप प्रत्यारोप होतायत. या सगळ्या मध्ये ज्यांच्या अखत्यारीत हे मैदान आहे ते कोल्हापूर महापालिका प्रशासन काहीच भूमिका घेताना दिसत नाही. राजकारणाच्या पलीकडं जाऊन खेळा बरोबरच कोल्हापूरच्या इतिहासातील अनेक राजकीय, सामाजिक घटनांचा साक्षीदार असलेलं हे मैदान सर्व ऋतुमध्ये सुस्थितीत रहावं असं न वाटणं या सारखं दुर्दैव ते काय?.. ज्यांच्या नावानं देशभरात स्वच्छता मोहिमा राबवल्या जातायत त्या महात्मा गांधींचा पुतळा कमालीची अस्वच्छता असलेल्या मैदानातच जयंती निमित्त पूजण्यात आला. याच मैदाना पासून काही अंतरावर असलेल्या रंकाळा तलाव परिसरात महापालिकेनं आज स्वच्छता अभियान राबवत महात्मा गांधींच स्मरण केलं. पण त्यांचा पुतळा असलेल्या गांधी मैदानात त्यांच्या पुतळ्याच्या जवळच दुर्गंधीयुक्त पाण्याचं डबकं साचलंय. विकासकामांसाठी निधी आणल्याचा ढोल वाजवताना लोकप्रतिनिधींनी तो निधी योग्य पध्दतीनं खर्च व्हावा याकडं सुध्दा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण विकासकामांसाठी येणारा पैसासुध्दा जनतेच्या घामाचाच आहे.
आपल्या देशाला अनेक महाविभूतींनी ललामभूत केलंय. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना त्या प्रत्येकाकडून त्यांचा एक विचार अंमलात आणला तर देशाच्या आजच्या स्थितीत खूप मोठा बदल घडेल. पण हा बदल कुणालाच नकोय अशी स्थिती आहे. महात्मा गांधीं कडून त्यांनी स्वच्छते बाबत दिलेला विचार आपण अंमलातच आणत नसू तर त्यांची जयंती साजरी करणं हे केवळ नाटक ठरणार नाही का? गांधी मैदानाच्या विकासासाठी निधी आणणारे लोकप्रतिनिधी, यानिधीतून योग्य काम करून घेण्याची जबाबदारी असणारी महापालिकेची यंत्रणा यांनी गांभीर्यानं विचार करुन महात्मा गांधींच्या नावाचं हे मैदान स्वच्छ करावं नाही तर गांधी मैदान हे मैदानाचं नांव तरी बदलावं.