कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा शासन आदेशाला ठेंगा...
कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे शासन आदेशाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागात परिधान करणे सक्तीचे आहे. नियमित, कंत्राटी तसंच सल्लागार कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू आहे. मात्र, कोल्हापूर महापालिकेमध्ये हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक कर्मचारी ओळखपत्र न वापरता कार्यालयीन काम करताना दिसून येत आहेत. सुरक्षा आणि शिस्तीच्या दृष्टीने ओळखपत्र वापरणे आवश्यक असताना कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे नियम तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची ओळखपत्र न घालण्याची वृत्ती प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. महापालिका प्रशासन शासन आदेशाला ठेंगा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे बघावं लागणार आहे.