आंबा घाटात साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यास मंजुरी

<p>आंबा घाटात साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यास मंजुरी</p>

कोल्हापूर – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना वळणा वळणाचा धोकादायक घाट पार न करता सुखकर प्रवास करता येणार आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याच महामार्गावर आंबा घाट हा सुमारे सात किलोमीटर लांबीचा असून, या घाटात अनेक ठिकाणी अतिशय धोकादायक आणि तीव्र वळणे आहेत. या वळणांमुळे घाटात अनेकदा अपघात होतात आणि वाहतूक कोंडी होते. 
या पार्श्वभूमीवर, घाटाची सुधारणा आणि रुंदीकरण करताना, ही धोकादायक वळणे कायमस्वरूपी वगळण्यासाठी बोगद्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. साडेतीन किलोमीटरचा बोगदा तयार झाल्यास, घाटातील धोकादायक भाग पूर्णपणे टाळता येणार आहे आणि प्रवास अत्यंत सुरक्षित व जलद होणार आहे. या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.