कोल्हापुरातील बागल चौक परिसरात एमआयएम पक्षाचं कार्यालय स्थापण्यास स्थानिकांचा विरोध

कोल्हापुरातील बागल चौक परिसरात एमआयएम पक्षाचं कार्यालय थाटण्यात आलंय. उद्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र बागल चौक मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केलाय. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पार्किंगच्या जागेत बेकायदेशीर रित्या हे कार्यालय सुरू केल्याबद्दल नोटीस लावलीय. सध्या याठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
एम आय एम पक्षाचं कार्यालय कोल्हापुरातील बागल चौकात थाटण्यात आलंय. उद्या एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. दरम्यान काल हिंदुत्ववादी संघटनांनी एमआयएम पक्षाचे खासदार ओवेसी हे कोल्हापुरात येवून सामाजिक तेढ निर्माण करण्याची शक्यता असल्यानं ओवेसी यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर प्रतिबंध करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडं केली होती. दरम्यान आज सकाळी बागल चौक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिसांना निवेदन देऊन या परिसरात अनधिकृतपणे पार्किंगच्या जागेत एमआयएम पक्षाचं कार्यालय थाटण्यात आल्याबद्दल तक्रार केली. तर हिंदू एकताच्या वतीनं उद्या सोमवारी दुपारी दीड वाजता बागल चौकातल्या पंचमुखी मारुती मंदिरात महाआरती करणार असल्याच पत्रक हिंदू एकताचे गजानन तोडकर यांनी प्रसिद्धीस दिलं.
दरम्यान, आज दुपारी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी बागल चौक परिसरात भेट दिली. यावेळी महापालिकेच्या नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले हे देखील बागल चौक परिसरात आले. यावेळी पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे पक्ष कार्यालय थाटल्याबद्दल महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी नोटीस लावण्यात आली. दरम्यान एमआयएमच्या कोल्हापुरातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्या खासदार ओवेसी येणार होते. याला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असल्यानं परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बागल चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.